अकरावीसाठी २१ मे रोजी सुरू झालेली ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया काही तासांतच तांत्रिक कारणामुळे ठप्प झाली होती.
अकरावी प्रवेशप्रक्रिया आता २६ मेपासून सुरू होणार |
अकरावीसाठी २१ मे रोजी सुरू झालेली ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया काही तासांतच तांत्रिक कारणामुळे ठप्प झाली होती. ही प्रवेशप्रक्रिया आता सोमवारी २६ मेपासून सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिली. प्रवेशप्रक्रियेचे नवीन वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. ज्या सॉफ्टवेअर कंपनीला ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते, त्या कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण आल्याने प्रवेशप्रक्रियेत अडथळा आल्याचे विभागातील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, ग्रामीण भागात गावातल्या गावातच विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात. तसेच १५ जूनपर्यंत ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालय सुरू होतात. मात्र, ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतील घोळामुळे त्यात आडकाठी येण्याची शक्यता व्यक्त करत येथील प्रवेशप्रक्रिया ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सरचिटणीस मुकुंदराव आंधळकर यांनी केली आहे.
प्रवेशप्रक्रियेचे नवे वेळापत्रक
- २६ मे ते ३ जून अर्ज प्रक्रिया
- ५ जून तात्पुरती गुणवत्तायादी
- ६ ते ७ जून हरकती व निराकरण
- ९ जून ते ११ जून प्रवेश निश्चिती
- ११ ते १८ जून माध्यमिक विद्यालयात जाऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे
0 Comments